बिहारमध्ये पुन्हा महापुराचा हाहाकार; सत्तेतील ‘डबल इंजिन’ सरकार 17 वर्षांत पूर रोखण्यात अपयशी! राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये पुन्हा एकदा पुराचे संकट ओढवले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील लाखो नागरिक पुरामुळे प्रभावित झाले असून शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. या भीषण दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्यापही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्या कुटुंबियांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र संवेदना व्यक्त करत सत्तेतील ‘डबल इन्जिन’ सरकार 17 वर्षांत पूर रोखण्यासाठी काय केले असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी केला.

या संकटावर तीव्र चिंता व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, बिहारमधील ही विपत्ती नवीन नाही. दरवर्षी राज्यात पूर येतो, निष्पाप लोकांचे बळी जातात, संसार उद्ध्वस्त होतात आणि नागरिकांना नाईलाजास्तव पलायन करावे लागते. गेल्या 17 वर्षांत या दरवर्षी होणाऱ्या त्रासावर मात करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून काय ठोस पावले उचलण्यात आली? जमिनीवर नेमके काय बदलले? याचे स्पष्ट उत्तर बिहारमधील जनतेला भाजपच्या ‘डबल इंजन’ सरकारने दिले पाहिजे, असा सवाल राहुल गांधी यांवी उपस्थित केला आहे. बिहारच्या जनतेला दरवर्षी केवळ पोकळ आश्वासने आणि तात्पुरती मदत नको, तर या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना हवी अशा शब्दात राहुल गांधी यांनी डबल इंजिन सरकारची कान उघडणी केली.