
उत्तर प्रदेशातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री बी.एल. वर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री स्मती इराणी यांची नावे वगळण्यात आली आहेत. या निवडणूक भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावरून केंद्रातही काही फेरबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उत्तर प्रदेशात दहा जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यमंत्री धर्मपाल सिंह, वकील राधाकांत ओझा, राज्य ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश पाल, माजी खासदार विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडे, माजी खासदार प्रियंका सिंह रावत, राज्याचे सरचिटणीस राम प्रताप सिंह चौहान आणि झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांची कन्या श्रुती गंगवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत भाजपने राज्यातील जातीय समतोल साधला आहे. पक्षाने ओबीसी प्रवर्गातून तीन, खुल्या प्रवर्गातून तीन आणि अनुसूचित जातींमधून दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या यादीत दोन ब्राह्मण आणि एका राजपूत उमेदवाराचाही समावेश आहे. सर्व आठ उमेदवार मंगळारी सकाळी 11.30 वाजता लखनौमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने दोन उमेदवारांची नावे जाहीर केली असून, ते तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


























































