Sion Bus Depot Fire – शीवमधील आणिक बस आगारात अग्नीतांडव, 10 बसेस जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीवमधील आणिक बस आगारात सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत 10 सीएनजी बसेस जळून खाक झाल्या. बस आगारातील आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये ही घबराट पसरली होती. आग आटोक्यात आली असून कोणालाही दुखापत झाली नसल्याचे बेस्ट उपक्रमाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाच्या शीव येथील आणिक आगारामध्ये भीषण अग्नितांडव घडले. एका मागोमाग एक तब्बल दहा बस गाड्यांना भीषण आग लागली. या सर्व गाड्या वेटलिजच्या अर्थात कंत्राटदारांच्या असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सर्व बसेस जळून खाक झाल्यामुळे बेस्टमधील कंत्राटदार कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सर्व गाड्या सीएनजीवर चालणाऱ्या होत्या. आगीवर आता नियंत्रण मिळवले असून अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा पुढील सुरक्षात्मक खबरदारी घेत आहेत.