पोलीस डायरी – गुन्हेगारी विश्वातील ‘लेडी डॉन!’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

एकेकाळी (१९८०-९० च्या दशकात) ठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या उल्हासनगरची ‘कातिलों की बस्ती’ अशी ओळख होती. मेलेल्या मुडद्यांचाही तिथे व्यापार व्हायचा! तर त्याच्या उलट ठाणे शहराची एक सांस्कृतिक शहर अशी ओळख होती, परंतु शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे निधन (२६ ऑगस्ट २००१) झाल्यानंतर आमदार पप्पू कलानीच्या उल्हासनगरसारखी ठाणे शहराची आता अवस्था झाली आहे. रोज रस्त्यावर रक्ताचे सडे पडत आहेत. ठाणे शहर गेल्या काही वर्षांपासून दहशतीखाली जगत आहे. कारण आता पोलीस ठाणीही सुरक्षित नाहीत. नव्हे, त्यांचे ठाणे शहरात अस्तित्वच शिल्लक राहिलेले दिसत नाही. ठाणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत. मध्यंतरी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी तर हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये शिंदे गटाचा कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून ४ गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडे शिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धू अभंगे यास कोपरी पोलीस ठाण्यात घुसून महिलांकडून मारहाण करण्यात आली होती. महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या डोंबिवलीच्या रमेश म्हात्रे या शिंदे गटाच्या नगरसेवकाचा तर न्यायालयानेच माज उतरविला आहे.

ठाणे जिल्ह्यात शिवसेना व भाजपचा प्रभाव वाढत असून शिंदे गटाचा अस्त सुरू झाला आहे. प्रत्येक प्रकरणात शिंदे गटाचे कार्यकर्ते मार खात आहेत. ठाणे जिल्ह्यातील आपले वर्चस्व, प्रभुत्व (Dominace) संपत आहे हे लक्षात आल्यावर ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ठाण्याच्या मानपाडा परिसरात कट रचला गेला आणि काही कोटींची सुपारी देऊन तो शेवटास नेण्यास आला.

प्रदीप यशवंत पूर्णिकर उर्फ बाळू हे मानपाडा येथील शिवसेनेचे लोकप्रिय विभागप्रमुख मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी बसले असताना रात्री ९.३० च्या सुमारास त्यांना भेटावयास गेलेल्या चार ते पाच शस्त्रधारी तरुणांनी गोळ्या घालून व शस्त्राने वार करून ठार मारले. या हत्येने सारे ठाणे हादरून गेले. प्रदीप पूर्णिकर यांच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील पप्प्या शिंदे हा प्रदीप पूर्णिकर यांचा परिचित आहे.

प्रदीप पूर्णिकर यांच्या हत्येमागचा खरा सूत्रधार ठाण्यात ज्यांची लेडी डॉन अशी ओळख आहे, त्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे असल्याचा आरोप प्रदीप पूर्णिकर यांच्या २६ वर्षीय मुलगा राम याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात नमूद केलेल्या तक्रारीत (FIR) केला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने राम याने ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मीनाक्षी शिंदे या मूळच्या आगरी समाजाच्या असल्याने आगरी समाजाविषयी केलेले भाष्य अत्यंत संतापजनक आहे. अशा शिवराळ महिलेने ठाण्यात प्रचंड मालमत्ता उभारली आहे. मानपाडा, आझाद व मनोरमा नगर येथील पुनर्विकासात रस दाखविणाऱ्या या महिलेने ठाणे महानगरपालिका निवडणूक लढविली तेव्हा बनावट जात प्रमाणपत्र सादर केले आहे असाही आरोप झाला असून ही महिला वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मी ठाण्याची ‘डॉन’ आहे. माझे कोण वाकडे करणार असे ती उघडपणे बोलते.

राजकीय दबाव पाहता ठाणे पोलीस खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचतील असे वाटत नाही. एसआयटीमधील एक तपास अधिकारी (उपायुक्त असलेला) तर सातारच्या वाईचा आहे. ज्या अधिकाऱ्याचे ठाण्यात दोनदा पुनर्वसन करण्यात आले आहे तो अधिकारी प्रदीप पूर्णिकरांना कसा काय न्याय देणार? असा प्रश्न पडतो. प्रदीप पूर्णिकर यांच्या हत्येचा आरोप असलेल्या मीनाक्षी शिंदे यांचे नाव आज ना उद्या मुंबईत चर्चिल्या गेलेल्या महिला डॉनच्या यादीत नक्की झळकेल! गुन्हेगारी विश्वात लेडी डॉन म्हणून दक्षिण मुंबईतील दाऊदची बहीण हसीना पारकर, दाऊदला आव्हान देणारी सपना दीदी, गंगूबाई काठियावाडी, मुंबईच्या पूर्व उपनगरीतील छोटा राजनची पत्नी नानी व १९७० या दशकातील जेनाबाई दारूवाला या महिलांची नावे घेतली जातात. मीनाक्षी शिंदे यांची शिवराळ भाषा, आक्रमक वागणे पाहता त्यांचाही येथून पुढे गुन्हेगारी विश्वात लेडी डॉन म्हणून उल्लेख केला जाईल एवढे नक्की! मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची मानपाडा परिसरात दहशत आहे हे त्यांच्या धमक्यांवरून दिसून येते.

महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मीनाक्षी शिंदे यांची व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिपही जोडली आहे. त्या क्लिपमधील एका संभाषणात मीनाक्षी शिंदे या अत्यंत असभ्य, अर्वाच्च, अश्लील भाषेत बोलताना घरात घुसून मारण्याचीही धमकी देत आहेत.

मीनाक्षी शिंदे म्हणतात, “मी घरात पोरं पाठवून तुमची इज्जत काढीन, वन टू वन या मग मी दाखवते तुम्हाला माझा इंगा, मी तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. एवढे लक्षात ठेवा.” मीनाक्षी शिंदे यांची ही ऑडिओ क्लिप माझ्या वडिलांना संबोधून असल्याचाही दावा राम प्रदीप पूर्णिकर यांनी केला आहे.

दाऊदची बहीण नागपाडा परिसरात खुलेआम दरबार भरवायची आणि रिअल इस्टेट व खंडणी वसुलीचे व्यवहार करायची. छोटा राजनची पत्नी नानीही तेच करीत होती, असा आरोप होता. मुंबई क्राईम ब्राँचने नानीवर मोक्काची कारवाई केली होती. हाजी मस्तान, करीमलालाच्या काळात जेनाबाई दारूवाला ही मध्यस्थाचे काम करायची. अशा कितीतरी महिला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अंडरवर्ल्डशी जोडल्या गेल्या आणि त्यांची नावे गुन्हेगारी विश्वात महिला डॉन म्हणून पुढे आली. गुजरातच्या संतोष बेन या लेडी डॉनवर तर ५०० च्या वर एफआयआर दाखल झाले होते. अशा या गुन्हेगारी विश्वातील अनेक महिलांवर हिंदी चित्रपट व वेबसीरिज बनल्या आहेत. आता मीनाक्षी शिंदेंवरही एखादी वेबसीरिज आली तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये!

[email protected]