INDIA Alliance Protest राहुल गांधी, प्रियांका गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी दिल्लीत लोकशाही बचाव मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा निवडणूक कार्यालयात पोहोचण्याआधीच पोलिसांनी आकाशवाणी भवनाजवळ रोखून धरला. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदारांनी आकाशवाणी भवन येथे आठ तास ठिय्या दिला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या इतर खासदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी निवडणूक आयोगा विरोधातील आंदोलनादरम्यान कोणतीही अधिकृत परवानगी न घेताच हे नेते आकाशवाणी भवन संकुलात घुसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

‘इंडिया’ आघाडीने संसद भवनापासून निवडणूक आयोगाचे मुख्यालय असलेल्या निवडणूक आयोग मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला, मात्र या मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी मागितली नव्हती, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. आंदोलकांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ थांबवण्यात आल्यानंतर अनेक विरोधी पक्षनेते आणि खासदारांनी तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी इतर नेत्यांसह आकाशवाणी भवन संकुलात दाखल झाले आणि त्यांनी तिथेही आंदोलन चालू ठेवले.

पोलिसांनी आंदोलकांना जागा खाली करण्यास सांगितले, मात्र जोपर्यंत खासदारांच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत जागा सोडणार नाही, अशी भूमिका नेत्यांनी घेतली होती. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी व इतर आंदोलकांना परिसरातून बाहेर काढून ताब्यात घेतले.