
फ्रान्समध्ये शाळांची दुरवस्था, शिक्षणाचा खालावलेला दर्जा आणि शैक्षणिक सुविधांचा तीव्र अभाव या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या आंदोलनात मंगळवारी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक रस्त्यावर उतरले होते. राजधानी पॅरिससह देशभरात तीव्र निदर्शने सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. हा मुद्दा केवळ शाळांचा नसून, मोठ्या प्रमाणावर झालेले अनियंत्रित स्थलांतर आणि इस्लामशी जोडलेला असून इस्लामला फ्रान्सवर ताबा मिळवायचा आहे, असा दावा त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या कमी उत्पन्न असलेल्या भागांमध्ये सप्टेंबर महिन्यात शालेय आंदोलनांची ठिणगी पडली होती, जी आता देशभरात पसरली आहे. शाळांमधील साधनांची कमतरता, शिक्षकांची तीव्र कमतरता, वर्गखोल्यांमधील प्रचंड गर्दी, मोडकळीस आलेल्या इमारती, निकृष्ट देखभाल आणि आवश्यक सुविधांचा अभाव याविरोधात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या देशव्यापी आंदोलनामुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारवरील अडचणी आणि दबाव वाढला आहे.
अनेक शहरांमध्ये ही निदर्शने शांततापूर्ण मार्गाने पार पडली, मात्र स्ट्रासबर्ग, ल्योन आणि रेन यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक स्वरूप आले. काही संतप्त आंदोलकांनी सार्वजनिक ठिकाणी आग लावून पोलिसांच्या दिशेने वस्तू फेकल्या, ज्यामुळे तणाव वाढला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा नळकांड्यांचा वापर करावा लागला. स्थानिक पातळीवरील शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांवरून सुरू असलेल्या या आंदोलनाला ट्रम्प यांच्यासह युरोपमधील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी स्थलांतर आणि धार्मिक मुद्द्यांची किनार जोडल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता मोठे जागतिक राजनैतिक वळण मिळाले आहे.
























































