प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेवर अमानुष अत्याचार; झाडाला बांधून भरचौकात संबंध ठेवण्यास केली सक्ती, ९ जण अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेलेल्या एका विवाहित महिलेवर तिच्या गावातील लोकांनी व पतीने अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे उघडकीस आली आहे. ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि ज्या पुरुषासोबत ती गेली होती, त्याच्यासोबतच लोकांसमोर लैंगिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडण्यात आले. या विकृत कृत्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी गेली होती. सुरुवातीला पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला पकडून घरात डांबून ठेवले होते. मात्र, संधी मिळताच ती पुन्हा त्या व्यक्तीसोबत निघून गेली. यानंतर पतीने गावातील काही लोकांच्या मदतीने दोघांचा शोध घेतला आणि त्यांना बळजबरीने गावात परत आणले. गावात आणल्यानंतर तथाकथित ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली दोघांनाही क्रूर वागणूक देण्यात आली. महिलेला एका झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्यासोबत गेलेल्या पुरुषाला तिच्यासोबत सर्वांसमोर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. यावेळी तिथे उपस्थित असलेले लोक मदतीऐवजी या घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुरेंद्रनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) प्रेमसुख डेलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी पीडित महिलेचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवून दोन महिलांसह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. स्वतः कायदा हातात घेऊन एका महिलेचा सार्वजनिक अपमान आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.