RBI ने रेपो रेट वाढवला; २०, ३० आणि ५० लाखांच्या गृहकर्जावर किती ईएमआय कापला जाणार? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी बुधवारी तीन दिवसीय एमपीसी (मनी पॉलिसी कमिटी) बैठकीचा निकाल जाहीर केला. त्यांनी सांगितले की, रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली असून, तो ५.२५% वरून ५.५०% झाला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे दर वाढू शकतात. आरबीआयने व्याजदर वाढवल्याने ईएमआय किती वाढेल, हे जाणून घेऊया.

एखाद्या व्यक्तीने बँकेकडून २० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे आणि या कर्जावरील व्याजदर सध्या ७.५% आहे. २० वर्षांच्या कालावधीसाठी, हप्ता (EMI) १६,११२ रुपये येतो. परंतु आरबीआयच्या (RBI) २५ बेसिस पॉइंट, म्हणजेच ०.२५% व्याजदर वाढीनंतर, हा दर ७.७५% पर्यंत जाईल. याचा हिशोब केल्यास, त्याला २० लाख रुपयांच्या कर्जावर दरमहा १६,४१९ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. याचा अर्थ त्याला दरमहा ३०७ रुपये जास्त भरावे लागतील.

जर एखाद्या व्यक्तीने २० वर्षांसाठी ७.५० टक्के व्याजदराने ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले, तर त्यांना दरमहा २४,१६८ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. तथापि, आरबीआयने व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने वाढवल्यानंतर, त्यांचा मासिक ईएमआय ७.७५ टक्के दराने २४,६२८ रुपयांपर्यंत वाढेल. याचा अर्थ त्यांना दरमहा ४६० रुपये अधिक भरावे लागतील.

जर एखाद्या व्यक्तीने या रकमेचे बँकेकडून २० वर्षांसाठी ७.५ टक्के व्याजदराने कर्ज घेतले, तर त्यांना सध्या ४०,२८० रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागेल. परंतु जर कर्जावरील व्याजदर ७.७५ टक्के असेल, तर हा ईएमआय वाढून ४१,०४७ रुपये होईल. याचा अर्थ कर्जदाराला दरमहा ७६७ रुपये अधिक भरावे लागतील.

रिझर्व्ह बँकेने जवळपास चार वर्षांनंतर रेपो दरात वाढ जाहीर केली आहे. यापूर्वीची वाढ फेब्रुवारी २०२३ मध्ये झाली होती. यावर्षी, गेल्या तीन बैठकांपासून रेपो दर ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला होता. परंतु सणांच्या अगदी आधी, मध्यवर्ती बँकेने तो ५.५० टक्क्यांपर्यंत वाढवून कर्जदारांना दणका दिला आहे.