
देवरूख ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून रूग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या कारभाराबाबत रूग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. देवरूखमधील सुज्ञ नागरिकांनीही रूग्णालयाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. व नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर पाढाच वाचला. यानंतर डाँ. भास्कर जगताप यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत कानउघडणी केली. आपण जनतेचे सेवक आहोत याची अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणीव असली पाहिजे. कोणीही कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा डाँ. जगताप यांनी दिला आहे. देवरूख ग्रामीण रूग्णालयाची भव्यदिव्य नूतन इमारत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आली आहे. मात्र रूग्णालयात सोई सुविधा नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अनास्था असल्याचा आरोप रूग्णांकडून करण्यात येत आहे. रूग्णालयात आल्यावर चांगली वागणुक मिळत नसल्याचेही रूग्णांचे म्हणणे आहे. याची दखल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी घेत ग्रामीण रुग्णालयाला भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली.
अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी रूग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. यामध्ये रुग्णालयात 24 तास डॉक्टर उपलब्ध असावेत, बाह्यरुग्ण तपासणी विभाग वेळेत सुरू व्हावा, रुग्णांसाठी असणाऱ्या सेवा सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, रत्नागिरीत पाठविण्यात येणाऱ्या रुग्ण संख्येत घट व्हावी, चांगल्या प्रकारे सेवा मिळून तक्रारी कमी झाल्या पाहिजेत अशी मागणी स्थानिक नागरिक हेमंत तांबे, निखिल कोळवणकर, नगरसेवक बाळा कामेरकर, निलेश भुवड, शेखर जोगळे, मनोहर गुरव, साई कामेरकर, आकाश भोपळे आदींनी केली. यावेळी डॉक्टरांच्या कमतरतेबाबत बोलताना डॉ. जगताप यांनी सध्या पाच डॉक्टर कार्यरत असून अधिकाऱ्यांनी त्याचे योग्य नियोजन करावे. रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची पुरेपुर काळजी घ्यावी. रूग्णालयाच्या कामकाजावर आपले बारीक लक्ष राहणार असून महिन्यातून एकदा आपण रूग्णालयाला भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर रूग्णालयाची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉ. जगताप यांनी भेट दिल्याबद्दल रूग्ण, नातेवाईक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



























































