‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा यांच्या कंपनीवर आयकर विभागाची धाड; प्राइम फोकसच्या शेअरमध्ये तब्बल 8 टक्क्यांपर्यंत घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस लिमिटेड या कंपनीच्या मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने बुधवारी छापेमारी सुरू केली. कंपनीसोबतच तिच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या (सीए) ठिकाणांवरही आयकर विभागाकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि निर्मिती संस्थांशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान काही कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आली होती. त्याच तपासाचा पुढील भाग म्हणून प्राइम फोकस आणि संबंधित सीएच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आयकर विभागाला कथित करचुकवेगिरी, आर्थिक अनियमितता आणि परदेशात निधी हस्तांतरित करण्याशी संबंधित व्यवहारांची माहिती मिळाल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून आर्थिक कागदपत्रे, व्यवहारांचे रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे. संबंधित व्यवहारांचा नेमका स्वरूप आणि त्यामागील उद्देश काय होता, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, आयकर विभागाच्या या कारवाईचा थेट परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. छापेमारीची बातमी समोर आल्यानंतर प्राइम फोकसच्या शेअरमध्ये तब्बल 8 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

नमित मल्होत्रा हे चित्रपट आणि व्हिज्युअल इफेक्ट्स क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या प्राइम फोकस कंपनीचा चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा व्यवसाय आहे. आता ते ‘रामायण : पार्ट वन’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहेत. रणबीर कपूर या चित्रपटात राम यांच्या भूमिकेत दिसणार असून साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे.