
मुंबईतील अस्वच्छता तसेच कचरा व्यवस्थापनावरून उच्च न्यायालयाने आज महापालिकेची खरडपट्टी काढली. केवळ नरीमन पॉइंट किंवा दक्षिण मुंबईचा परिसर स्वच्छ असल्याने संपूर्ण मुंबई स्वच्छ असल्याचे म्हणता येणार नाही असे सुनावत पालिकेचा स्वच्छतेचा दावा हायकोर्टाने फेटाळून लावला. पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत फार मोठी प्रगती केलेली दिसत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने पालिकेचे कानही टोचले.
कांजूर डम्पिंग ग्राऊंडमुळे होणारे वायुप्रदूषण व इतर त्रासाबाबत कन्नमवार नगर येथील रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अभिजित राणे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज बुधवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. मुंबईतील अस्वच्छतेवरून महापालिकेच्या कार्यपद्धतीवर खंडपीठाने ताशेरे ओढले. सगळीकडे घाण आहे. केवळ दक्षिण मुंबई स्वच्छ आहे किंवा नरीमन पॉइंट स्वच्छ आहे म्हणून संपूर्ण मुंबई स्वच्छ झाली असे होत नाही, असे सुनावत न्यायालयाने सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले तसेच 2 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानमध्ये नेमकी काय कार्यवाही करण्यात आली, केईएम रुग्णालयासह अन्य महापालिका रुग्णालयांकडून मलेरिया, डेंग्यू, एच1एन1 यांसारख्या संसर्गजन्य व कीटकजन्य आजारांमुळे दाखल होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.
परदेशात कॅमेरे, मुंबईत नियमभंग
न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची जाणीव निर्माण करण्यासोबतच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची गरज व्यक्त केली. एक दिवस असा येईल की नागरिक स्वत- कचरा कचरापेटीत टाकतील. परदेशात आपण असेच करतो. कारण तेथे कॅमेरे आहेत, नियमभंग केल्यास पकडले जाण्याची भीती आहे. मात्र, मुंबईत कोणतीही चिंता नसल्यासारखी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.
न्यायमूर्ती काय म्हणाले?
जोगेश्वरी परिसरातील एका महापालिका शाळेजवळील डोंगर प्लॅस्टिकच्या कचऱ्याने भरलेला दिसल्याचा उल्लेख न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी केला. संपूर्ण डोंगर प्लॅस्टिकने भरला आहे. हे मुंबई आहे, यावर विश्वास ठेवता येईल का? साधी स्वच्छता करण्यासाठी एक दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. मात्र काहीच झालेले नाही. हे अविश्वसनीय आहे, अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.






























































