
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा कोकणातील हापूस आंब्याला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही वर्षांत आंबा पिकाची उत्पादकता घसरली आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने ऐन सप्टेंबर महिन्यातच बागायतदारांना ऑक्टोबर हीटच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या होत्या . अशातच यावर्षी थंडी गायब राहून तब्बल आठ महिने ऊन्हाळाच राहाण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविल्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदार पुरते धास्तावले आहेत.
२००९ मध्ये आलेल्या फयान वादळानंतर कोकणातील आंबा पिकाला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्याला मोठे परकीय चलन मिळवून देणारे हे मुख्य पीक दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे. गतवर्षी मुबलक फुलोरा येऊनही कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर काळा पडला होता. यावर्षी मात्र एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस अत्यंत कमी पडला असून रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. हवामानात इतकी विषमता आहे की, अवघ्या तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर वेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामान, तीव्र उष्मा आणि कधी अचानक जाणवणारा गारवा या तिहेरी संकटाचा मोठा फटका आंबा पिकाला बसत आहे.
सध्या बागांमधील परिस्थिती पाहाता, गतवर्षी ज्या झाडांना मोहोर आला होता तिथे नवीन पालवी फुटली आहे, तर मोहोर न आलेली झाडे हिरवीगार दिसत आहेत. ऑक्टोबर हीटनंतर वेळेत थंडी सुरू झाली तरच या झाडांना योग्य फुलोरा येण्याची आशा आहे. मात्र, सध्या या नवीन पालवीवर तुडतुड्या किडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालवी वाचविण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असून खर्चाचा भार वाढला आहे.






























































