
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जुन्या मुलाखतीतील अनेक आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अभिनयातील बेधडकपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत मृत्यू, आयुष्य आणि प्रसिद्धीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अगदी मोकळेपणाने व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यांमध्ये मृत्यूबद्दलची त्यांची स्वीकाराची भावना आणि आयुष्याकडे पाहण्याचा साधा दृष्टिकोन दिसून येतो.
२०२३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांना इंडस्ट्रीतील कलाकार प्रसिद्धी आणि ग्लॅमरमुळे बदलतात, मात्र तुम्ही तसे का बदलला नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नाना पाटेकर यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत उत्तर दिलं होतं. “मला माहीत आहे की आपल्याला जायचं आहे आणि १२ मण लाकूड लागणार आहे. हीच माझी पूर्ण प्रॉपर्टी आहे. याच्यासोबत मी निघून जाणार,” असं ते म्हणाले होते.
मृत्यूनंतर काय होणार याबाबतही नाना पाटेकरांनी मिश्कील पण अंतर्मुख करणारी भूमिका मांडली होती. “मी प्रत्यक्षात सुकी लाकडं ठेवली आहेत. मला त्याच लाकडात जाळा, असं मी सांगून ठेवलं आहे. ओलसर लाकूड वापरू नका. नाहीतर धूर होईल आणि आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात जाईल,” असं त्यांनी म्हटलं होतं.


























































