देशाला मिळालेलं स्वातंत्र्य, नागरिकांचा मताधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू; खरगेंचा हल्लाबोल, इंडिया आघाडी राजघाटावर आंदोलन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात इंडिया आघाडी रस्त्यावर उतरली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांची एकजूट पाहायला मिळाली. एसआयआर प्रक्रिया रद्द करा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी इंडिया आघाडीचे जवळपास 300 खासदार रणांगणात उतरले आहेत. सलग दोन दिवस आंदोलन रोखल्यानंतर आता इंडिया आघाडीचे खासदार भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज राजघाटावर जाऊन आंदोलन करणार आहेत.

कॅनॉट प्लेस येथे आयोजित स्नेहभोजनानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीतील घटकपक्षांचे खासदार राजघाटाकडे रवाना झाले. यावेळी खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि नागरिकांचा मताधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका खरगे यांनी केली.

इंडिया आघाडीचे सदस्य शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यासाठी गांधी स्मारकाकडे जात असून तेथे बसून केंद्रातील भाजप सरकारला सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करणार असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांमुळे देशाच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतांची चोरी, वाढती महागाई, तरुणांसमोरील समस्या आणि अन्य प्रश्नांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या नेत्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, अधिकार आणि मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही खरगे यांनी केला. हे थांबविण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी, यासाठी गांधी स्मारक येथे शांततापूर्ण आंदोलन आणि प्रार्थना करण्यात येणार असल्याचे खरगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकशाहीची हत्या, राहुल गांधींकडून पुनरुच्चार

दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना लोकशाहीची हत्या होत असून मतचोरी होत असल्याचा पुनरुच्चार केला. जवळपास 300 खासदारांना शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. परंतु पहिल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ रोखण्यात आले. दुसऱ्या दिवशी जंतरमंतरला जाण्यापासून रोखण्यात आले. काही लोकांना मारहाणही करण्यात आली. सत्य हेच आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत आणि ज्ञानेश कुमार यांनी सुनियोजित कटाद्वारे देश हायजॅक केला आहे. त्यांनी लोकशाहीची हत्या केली असून मतचोरी केली आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांना केला.