
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पुलावरील तीव्र वळणाच्या उतारावर दोन कंटेनरची धडक होऊन झालेल्या अपघातात एक चालक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक जावेद मलिक (रा. सारंगपूर, उत्तर प्रदेश) हे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. अंजनारी पुलावरील तीव्र वळणाच्या उतारावर त्यांच्या ताब्यातील कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने पुढे जात असलेल्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात चालक जावेद मलिक किरकोळ जखमी झाले. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेतून पाली येथे रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताचे वृत्त कळताच हातखंबातील महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचवून काही काळ वाहतूक कोंडी झाली होती ती बाजूला करण्यात आली. अपघातानंतर रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करण्यात आले असून, अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. अपघातस्थळी लांजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.































































