
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव बोलेरो कार आणि ट्रकमध्ये झालेल्या या जोरदार धडकेत 7 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 20 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर अनेक मजूर ट्रकखाली चिरडले गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून जखमींच्या किंचाळण्याने परिसर दुमदुमला. घटनेची माहिती मिळताच पश्चिम कच्छ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलीस आणि बचाव पथकाने वाहनांमध्ये अडकलेल्या तसेच गाडल्या गेलेल्या कामगारांना बाहेर काढले. सर्व जखमी मजुरांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पश्चिम कच्छ पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण व परिस्थिती शोधणे, मृतांची अधिकृत ओळख पटवणे आणि जखमींच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवणे, अशी कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे.

























































