नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्युच्या प्रकरणात गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 194 अंतर्गत ही नोंद करण्यात आली आहे.

पणजी येथे नोंदवलेल्या प्रकरणातील माहितीनुसार, नाना पाटेकर यांना डोना पाउला येथील ओशन पार्कमधून मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयातील संबंधित वॉर्डमध्ये जाऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पोलीस पंचनामा करणार असून, गोवा मेडिकल कॉलेजमधील शवविच्छेदन अहवालावरून मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांसह संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

पोलिसांकडून सध्या मृत्यूशी संबंधित सर्व परिस्थितींची तपासणी केली जात आहे. तपासात मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यास प्रकरण बंद केले जाऊ शकते. मात्र, घातपात किंवा इतर संशयास्पद बाबी समोर आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

दरम्यान, मणिपाल रुग्णालयातील कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रुग्णालयात त्यांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. मात्र, नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांना माहिती देऊन नियमानुसार प्रकरणाची नोंद करावी लागली.

नाना पाटेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजच्या शवागारात नेण्यात आला होता. डॉक्टरांनी प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याचा उल्लेख केला; मात्र, त्यामागचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे सांगितले.

डॉ. साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना यापूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता आणि ते औषधे घेत होते, अशी माहिती रुग्णालयाला देण्यात आली होती. गुरुवारी पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी रात्री पुणे जिल्ह्यातील डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.