
उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आता ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा’ असे ठेवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी ही अधिकृत घोषणा केली. हे विमानतळ राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविरत 25 वर्षांच्या शासकीय नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने एक विशेष ठराव मंजूर केला असून, त्याअंतर्गतच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुरू झालेला मोदींचा हा कार्यकाळ आता 25 वर्षे पूर्ण करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “शासनाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखंड 25 वर्षांच्या लोकसेवेचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण ठराव उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते देशाचे नेतृत्व करतात ही संपूर्ण राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशने विकासाच्या एका नव्या युगात प्रवेश केला असून, राज्यात पायाभूत सुविधा आणि वारसा यांचा समन्वय साधत दुहेरी विकास वेगाने पुढे जात आहे.”
गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला दिले मोदींचे नाव
गुजरात सरकारने अहमदाबादमधील स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव दिले होते. मात्र नंतर या स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे.

























































