‘जेन-झी’ला सरकार घाबरलं, देशात आणीबाणीसारखी स्थिती; जंतरमंतरवर उद्या आंदोलन होणारच, CJP चा एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीने म्हणजेच सीजेपीने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकार जेन-झीला घाबरलं आहे. देशात सध्या आणीबाणीसारखी स्थिती आहे निर्माण झाली आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. सीजेपीने शनिवारी दिल्लीत जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाचा एल्गार केला आहे. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, सीजेपीचे कार्यकर्ते उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचे अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त केल्याने राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. दुसरीकडे सीजेपीने आंदोलकांना शनिवारी सकाळी १० वाजता जंतरमंतरवर एकजूट होण्याचे आवाहन केले आहे.

आंदोलकांना रोखण्यासाठी लोकांच्या येण्या-जाण्यावर आळा घालण्यात येत आहे. केंद्र सरकार ‘जेन-झी’ना घाबरते, असे म्हणत सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी निशाणा साधला आहे. जंतरमंतरवर आंदोलनासाठी सीजेपी कार्यकर्ते ठाम आहेत. तरुणांची तुम्हाला एवढी भीती वाटते तर संपूर्ण देश बंद करून टाका, असा हल्ला दीपके यांनी चढवला. १० ऑक्टोबरला म्हणजेच उद्या पहाटे ४ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने अभिजीत दीपके यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारला असं वाटतं असेल तर आम्हाला अटक करा, असे आव्हान अभिजीत दीपके यांनी दिले आहे.

सीजेपीच्या सौरव दास यांनी देशातील विद्यामान स्थितीची तुलना आणीबाणीशी केली. भाजप शासित राज्यांमध्ये पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. काहींना त्यांच्या घरातच नजरकैद करण्यात आले आहे. कुठल्याही संभ्रमात राहू नका. देशात आणीबाणी लागू झाली आहे आणि दिल्लीला छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे, असे सौरव दास म्हणाले.