
दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने जन्मदात्याने बिर्याणीत विष मिसळून मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना वडाळा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. शरीफ रझा हुसेन खान (45) असे आरोपी पित्याचे तर रिफत (20) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वडाळा पूर्व येथील शेख मिस्त्री दर्गा रोडजवळील मॅडोना कॉलनीत राहणाऱ्या खानच्या पत्नीचे नोव्हेंबर 2025 मध्ये कर्करोगाने निधन झाले. यानंतर खानला दुसरे लग्न करायचे होते. मात्र वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला खानच्या दोन्ही मुलींचा विरोध होता. या कारणातून घरात वडील आणि मुलींमध्ये वाद होते. याच वादातून खानने मुलींना संपवण्याच निर्णय घेतला.
खानने 2 ऑक्टोबर रोजी मुलींसाठी बिर्याणी आणली. या बिर्याणीत त्याने विष मिसळले आणि मुलींना खायला दिली. बिर्याणी खाल्ल्यानंतर दोन्ही मुली गच्चीवर झोपायला गेल्या. मात्र, उकाड्यामुळे दुसरी नुझहत आपल्या आत्याच्या घरी निघून गेली तर रिफत तिथेच झोपली होती. दुसऱ्या सकाळी खानने आपल्या एका नातेवाईकाल रिफत बेशुद्ध असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी तिला रुग्णालात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सुरवातीला विषबाधेमुळे रिफतचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे आणि श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर, वैद्यकीय निष्कर्ष आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी खानला अटक केली. वडाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





























































