56 इंचाची छाती असलेले या देशातील तरुणांना का घाबरले आहेत? दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊत यांचा मोदी-शहांवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. यावेळी दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेले सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांकासह शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. वढे घाबरलेले सरकार आत्तापर्यंत कधी पाहिले नाही. स्वतःला 56 इंचाची छाती असलेले म्हणवतात ते मोदी-शहा आता कोणाला घाबरत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पुण्यात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जनतेचं हे बंड तुम्ही थांबवू शकणार नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या पतनाची सुरूवात झालेली आहे. येत्या मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत मोदींचं सरकार शेवटचा श्वास घेईल आणि एक राष्ट्रीय सरकार येथे स्थापन होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

केंद्र सरकारने दिल्लीला जम्मू-कश्मिर केले आहे. तब्बल 15000 वाहने दिल्लीबाहेर अडकून पडली आहेत. ट्रेन रोखण्यात आल्या आहेत. ट्रेनमधून आंदोलनाला जाणाऱ्यांना रोखले जात आहे. एवढे घाबरलेले सरकार आत्तापर्यंत काधी पाहिले नाही. पण स्वतःला 56 इंचाची छाती असलेले म्हणवतात ते मोदी-शहा आता कोणाला घाबरत आहेत. दिल्लीत काय सुरू आहे, हे तेथील मुख्यमंत्र्यांनाही माहिती नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, या सरकारमध्ये राज्यकर्ते नाहीत, तर व्यापारी आहेत. जर याठिकाणी एखादा मजबूत राज्यकर्ता असता तर तो परिस्थितीला समोरा गेला असता. जनतेची, या देशातील विरोधी पक्षाची आणि तरूणांच्या संघटना ज्यांना तुम्ही कॉक्रोच किंवा मच्छर म्हणता त्यांची मागणी काय आहे, ती समजून घेतली असती. सर्वोच्च न्यायालयाने कालच एक प्रतिक्रिया दिली. माशी मारण्यासाठी हातोडा वापरणार का? म्हणजे हे लोक काय माशा आहेत? या सरकारसोबत काम करणाऱ्या संविधानिक पदावरील व्यक्तीची ही काय मानसिकता आहे? ‘एक कॉक्रोच सरकार को हि**** बना देती है’, हा अभिनेता नाना पाटेकर यांच्या डॉयलॉगचा उल्लेख करत संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले.

हे सरकार पुढील सहा महिन्यात शेवटचा श्वास घेईल

आता हे कॉक्रोच किंवा घोंघावणाऱ्या माशा दिल्लाीच्या दिशेने निघाल्या आहेत. आणि आता तुम्ही स्वत: दरवाजे बंद करून आतमध्ये बसले आहात. कोणत्या कायद्यानुसार तुम्ही या तरुणांना अतिरेकी, दहशतवादी, राष्ट्रद्रोही ठरवत आहात. ब्रिटिशांनी 1902 च्या काळामध्ये एक रवलेक्ट अॅक्ट कायदा आणला होता. या कायद्यानुसार, लोकांच्या बोलण्यावर बंदी, आंदोलनावर बंदी आणि सरकारला वाटेल तो अतिरेकी दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी ठरवले जात होते. नरेंद्र मोदींनी, अमित शहांनी तोच फॉर्म्युला यावेळी अमलात आणून देशातील तरुणांना, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या विरोधी पक्षाला दहशतवादी राष्ट्रविरोधी ठरवलंय. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. पुढील सहा महिन्यांमध्ये शेवटचा श्वास घेताना तुम्हाला दिसेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दिल्लीत आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे, यावरून संजय राऊत यांनी पोलिसांवर निशाणा साधला. पोलिसांनी बेकायदेशीर आदेश पाळू नयेत. हे विधान कदाचित राष्ट्रविरोधी मानलं जाईल. पण अशाच प्रकारची विधान आणीबाणीच्या काळामध्ये भाजपच्या नेत्यांनी केली. जयप्रकाश नारायण आणि चरण सिंग यांनी केलं होतं. पोलिसांच्या माध्यमातून जेव्हा विरोधकांवर दमन शक्तीचा वापर सुरू झाला होता, तेव्हा चरणसिंग आणि जयप्रकाश नारायण म्हणाले होते, पोलिसांनी सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत. आज परत एकदा तेच सांगण्याची वेळ आलेली आहे. पोलिसांना सुद्धा हे बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, असे संजय राऊत म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत शिवसेना पूर्णपणे सक्रिय

पहिल्या दिवशी संसद भवनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत विरोधी पक्षाकडून मोर्चा काढला त्यात राहुल गांधींबरोबर आम्ही सर्व सहभागी होतो. त्यानंतर पुढले चार दिवस आमचे काही कार्यक्रम आधीच ठरले होते. त्यामुळे जाणं शक्य झालं नाही. मात्र, उद्यापासून दिल्लीमध्ये जे-जे आंदोलन होतील त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. तुम्ही आम्हाला कुठेही बोलवा, अटक व्हायची वेळ आली तरी आम्ही तयार आहोत. या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत शिवसेना पूर्णपणे सक्रिय आणि सहभागी राहील. या देशातली जी सध्याची पिढी आहे त्यांनी कदाचित देशाचा 1947 पर्यंतचा स्वातंत्र्य लढा जर पाहिला नसेल आणि त्यांना तो अनुभवयचा असेल तर त्यांनी आत्ताच्या स्वातंत्र्य़ाच्या लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे. हा सुद्धा देशाच्या स्वातंत्र्याचाच लढा अस आम्ही मानतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे शिवसेना सहभागी आहे. कोणत्याही राष्ट्रीय कार्यापासून शिवसेना कधीच दूर गेलेली नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

एप्रिलनंतर मोदी राहणार नाहीत

एप्रिलनंतर मोदी राहणार नाहीत. मोदी राहिले नाहीत तर अमित शहा राहणार नाहीत आणि या देशामध्ये जे जनतेचं बंड आहे, त्याच्यामध्ये पुढल्या सहा महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होतील. या क्षणी विरोधी पक्षाकडे बहुमत नाही. पण देशातल्या जनतेला बदल हवा आहे आणि हा बदल आता होताना दिसतोय. अशा वेळेला एक पर्यायी सरकार स्थापन केलं जातं. जे अनेक ठिकाणी केलं आहे. आपल्या देशातून ब्रिटिश जेव्हा गेले तेव्हा सुद्धा पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रीय सरकार स्थापन झालं होतं. त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक होते त्यात डॉक्टर आंबेडकर होते, त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी होते असे अनेक विविध पक्षाचे लोक त्या सरकारमध्ये निवडणुका होईपर्यंत होते. त्यापद्धतीने एक सरकार इथे येऊ शकतं, अशी शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली.