मणिपूरच्या कामजोंगमध्ये हिंसाचार; महिलेची गोळ्या झाडून हत्या, अनेक घरे जाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरच्या कामजोंग जिल्ह्यात हिंसाचाराची घटना घडली आहे. एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे राज्यात हिंसाचाराची नवी लाट उसळली आहे. प्रशासनाला प्रतिबंधात्मक आदेश लागू करावे लागले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. हिंसाचारात अनेक घरे जाळल्याचे वृत्त आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नागा-बहुल जिल्ह्यातील कुकी-बहुल असलेल्या चसाड गावात शुक्रवारी रात्री 9.40 च्या सुमारास ही घटना घडली. डोमखोनी टौथांग असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मानेजवळ गोळी लागल्याने काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी हिंसाचार अधिकच तीव्र झाला; गोळीबार सुरूच होता आणि अनेक घरे जाळण्यात आल्याचे वृत्त आहे. ताज्या माहितीनुसार, या भागात अजूनही गोळीबार आणि जाळपोळीच्या घटना घडत होत्या.

पुढील हिंसाचार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चसाड पोलीस गेट जंक्शनच्या 400 मीटर परिसरात बीएनएसएस (BNSS) च्या कलम 162 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशांनुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू राहतील.