
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके सहभागी होणार होते. मात्र आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एकीकडे या घटना घडत असताना दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपके यांची आजी सावित्रीबाई दीपके यांचं वयाच्या 75 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
अभिजित दीपके यांचे मूळ गाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावामध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. अभिजीत आंदोलनासाठी दिल्लीत असताना ही दुर्दैवी घटना घडली. दीपके परिवार हे संभाजीनगरवरून गावी रवाना झाले आहे.
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या युट्यूबर ध्रुव राठी याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या आंदोलनासाठी मुंबईहून दिल्लीत दाखल झालेले सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपके यांनी स्वत: ही कारवाई आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लाईव्ह करत आम्हाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.






























































