आंबेडकरी जनता त्यांना धडा शिकवेल…, अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याने आईचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रान पेटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीने पुकरालेल्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदलोनकर्त्यांना डिटेन करण्याचा धडाका लावला आहे. दरम्यान, CJP संस्थापक अभिजीत दिपके, प्रवक्ते सौरभ दार आणि आशुतोष रंका मुंबईहून दिल्लीला गेले असता त्यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण तापलं आहे. या सर्व प्रकारावर अभिजीत दिपके यांच्या आई अनिता दिपके यांनी संताप व्यक्त केला असून आंबेडकरी जनता त्यांना धडा शिकवेल असा, इशारा दिला आहे.

या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिजित दिपके यांच्या आई अनिता दिपके यांनी IANS वृत्तसंस्थेशी बोलताना सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, “मला खूप वाईट वाटले. तो देशासाठी चांगले काम करत आहे. सरकार हे चुकीचे करत आहे. आंबेडकरवादी लोक त्यांना धडा शिकवतील आणि त्यांच्या कृत्याचे परिणाम दाखवतील,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, विमानामध्येच शिरून पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर खुद्द अभिजित दिपके यांनीही आक्षेप घेतला असून, आणीबाणीच्या काळातही अशी दडपशाही झाली नव्हती, असे म्हणत या कृतीला हुकूमशाहीची संज्ञा दिली आहे.