देशात आता लोकशाही राहिली नाही, ती संपवणारे देशद्रोही; प्रियांका गांधी यांचा मोदी-शहांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीतील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनादरम्यान आंदोलक तरुणांना ताब्यात घेतल्यावरून आणि राजधानीची नाकेबंदी केल्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. हिंदुस्थानात आता लोकशाही राहिली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हुकूमशाही चालवली जात असल्याचा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. लोकशाही कमजोर करण्यासाठी आणि ती संपवण्यासाठी सहकार्य करणारे लोक देशाशी देशद्रोह करत आहेत, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत प्रियंका गांधी यांनी गंभीर आरोप केला. यापूर्वी २५४ खासदारांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना पूर्णपणे बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले. ज्यामुळे त्यांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. विरोधी पक्षांच्या इतर निदर्शकांसोबतही अशीच अरेरावीची वागणूक दिल्याचे प्रियांका गांधी यांनी नमूद केले. यानंतर आता देशाच्या राजधानीची नाकेबंदी करण्यात आली. दिल्लीला सर्व बाजूंनी बॅरिकेड्स लावून सील करण्यात आले. ट्रेन्स आणि मेट्रो सेवा रोखण्यात आल्या. इंटरनेट बंद करण्यात आले आणि ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

आपल्या घटनात्मक अधिकारांतर्गत शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या तरुण-तरुणींना मारहाण करण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे प्रियांका गांधी यांनी सांगितले. त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीतील फेरफार हा निवडणूक आयोगाच्या संगनमताने झाल्याचा हा पुरावा नाही का? आणि सरकार स्वतःच्या वैधतेवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना व उत्तरदायित्वाला घाबरत आहे का? असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला. हिंदुस्थान आता लोकशाही देश राहिलेला नाही, तर ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून चालवली जाणारी हुकूमशाही आहे, असा घणाघात प्रियांका गांधी यांनी केला.