मुंबई महाविजयाच्या दिशेने, तुषार देशपांडेची हॅट्ट्रिक; मुंबईला 351 धावांची आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुषार देशपांडेने डावाच्या सुरुवातीलाच चंदिगडचे आघाडीचे तीन फलंदाज सलग चेंडूंवर बाद करत केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मुंबईने रणजी करंडकाच्या पहिल्या साखळी सामन्यात पाहुण्यांना अवघ्या 78 धावांतच गुंडाळले आणि त्यांच्यावर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही चंदिगडला देशपांडेने पहिल्याच षटकात धक्का देत दिवसअखेर त्यांची 1 बाद शून्य अशी अवस्था केली आहे. अवघ्या 20.1 षटकांच्या खेळात मुंबईने चंदिगडचे 79 धावांत 11 विकेट घेतल्यामुळे मुंबईकडे 351 धावांची प्रचंड आघाडी असून तिसऱ्याच दिवशी मुंबईचा महाविजय निश्चित आहे.

कालच्या 5 बाद 249 धावांवरून मुंबईने डाव सुरू केला, पण काल किल्ला लढवणारा कर्णधार सिद्धेश लाड आपल्या धावसंख्येत केवळ 6 धावांची भर घालून बाद झाला, पण त्यानंतर शम्स मुलानीही बाद झाला. मात्र पुढे तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेने आपल्या बॅटची चमक दाखवत 71 धावांची भर घातली. तुषारने 44 धावांची फटकेबाज खेळी केली. मग मोहित अवस्थीसह कोटियने 67 धावांची भागी रचली. दोघांनीही आपली वैयक्तिक अर्धशतके झळकावत मुंबईला चारशेचा टप्पा गाठून दिला. चंदिगडच्या रोहित धांडा आणि राज बावा यांनी प्रत्येकी चार
विकेट टिपले.

तुषार जोरदार

फलंदाजीत 2 षटकार आणि 4 चौकारांची आतषबाजी केल्यानंतर तुषार देशपांडेने गोलंदाजीतही चंदिगडला हैरान केले. त्याने डावातील 11 व्या षटकांत अर्जुन आझाद, शिवम भांबरी आणि दीपेंदर कुश यांच्या विकेट काढत 1 बाद 25 वरून चंदिगडची 4 बाद 25 अशी अवस्था केली. या धक्क्यानंतर चंदिगडच्या डावाला कुणीही सावरू शकले नाही. त्यांची मधली फळी तुषारने कापून काढल्यानंतर पाहुण्यांची 7 बाद 37 अशी केविलवाणी अवस्था होती. तेव्हा निशांक बिरलाने 15 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकार खेचत केलेल्या नाबाद 33 धावांमुळे चंदिगडचा संघ पन्नाशी गाठू शकला. तुषारने 17 धावांत 5 विकेट टिपले, तर मोहित अवस्थीने 9 धावांत 3 विकेट टिपल्या.