पाण्याचा गैरवापर झाल्यास कारवाई, जपून वापरा! व्यावसायिक आणि स्पोर्टस् क्लबच्या पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एल निनो’सारख्या हवामान विषयक घटकांच्या प्रभावामुळे 2026 मध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया सात धरणांतील पाणी साठय़ावर मोठा परिणाम झाला आहे. भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पाण्याचा गैरवापर झाल्यास कारवाई होणार आहे. औद्योगिक व व्यापारी आस्थापना आणि स्पोर्टस् क्लबना होणाऱया पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात सुरू राहणार असल्याचे पालिकेने जाहीर केले.

घरातील नळ विनाकारण सुरू ठेवू नयेत, नळ किंवा जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, वाहनांची व परिसराची स्वच्छता करताना पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच शक्य तेथे पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा. गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही पाणी बचतीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून वापर केल्यास उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे पालिकेने म्हटले आहे. पाणी गळतीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जल अभियंता विभागामार्फत विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान, पाणी गळती रोखण्यास प्राधान्य देत पाणी गळतीची प्रकरणे कालबद्ध पद्धतीने हाताळण्याचे निर्देशही पालिका प्रशासनाकडून संबंधितांना देण्यात आले आहेत.