आयसीसीची वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंवर कारवाई, पॉवेल आणि रदरफोर्ड यांच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजच्या रोव्हमन पॉवेल आणि शेर्फेन रदरफोर्ड या दोन्ही क्रिकेटपटूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कारवाई केली आहे. हिंदुस्थानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना फटकारण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट दिला आहे.

दोघांवर कारवाई का करण्यात आली?

 वेस्ट इंडीजच्या डावाच्या सहाव्या षटकात मयंक यादवने बाद केल्यानंतर पॉवेलने आपल्या बॅटने चेंडू दूर मारला होता. त्यामुळे पॉवेल हा आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला, जे क्रिकेट उपकरणांच्या गैरवापराशी संबंधित आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या डावाच्या 13 व्या षटकात वाईड देणाऱ्या रदरफोर्डने चेंडू वैध घोषित झाल्यानंतर पंचांवर आक्रमकपणे ओरडून आपली नाराजी व्यक्त केली. रदरफोर्डवर आचारसंहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, जे पंचांच्या निर्णयावर असहमती दर्शवण्याशी संबंधित आहे.

दोघांनीही चूक केली मान्य

पॉवेल आणि रदरफोर्ड यांना याबाबत विचारणा केली असता दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली. त्यानंतर या दोघांनी आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामना पंच पॅनेलचे सदस्य असलेले सामना पंच प्रकाश भट्ट यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली. दोन्ही खेळाडूंवरील आरोप मैदानातील पंच जयरामन मदनगोपाल आणि रोहन पंडित, तसेच तिसरे पंच नितीन मेनन आणि चौथे पंच वीरेंद्र शर्मा यांनी केले होते. पॉवेल आणि रदरफोर्ड यांनी आपली चूक मान्य केल्यामुळे औपचारिक सुनावणी करण्याची गरज पडली नाही.