
भाजपकडून सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणामुळे संपूर्ण देशात चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे युवापिढी पेटून उठली आहे. हीच युवापिढी मोदी आणि शहांच्या जुलमी सत्तेला सुरुंग लावणार आहे, असा घणाघात शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आज कामोठे येथे केला. गीते यांच्या उपस्थितीत कामोठे परिसरातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये माजी नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती गोपीनाथ भगत आणि जय महाकाली देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सोहळ्याला शिवसेना उपनेते बबन पाटील, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख समाधान काशीद, नगरसेविका मेघना घाडगे, रितिक्षा गोवारी, प्रिया गोवारी, विभागप्रमुख रामदास गवारी, प्रवीण जाधव, विश्वास पेटकर, सुनील गोवारी, कामोठे शहर संघटक संगीता राऊत, सुवर्णा वाळुंज, धनश्री राठोड, कामगार नेते अविनाश मोरे आणि शिवसेना आरोग्य सेनेचे पदाधिकारी डॉ. आशिष बांदेकर आदी उपस्थित होते.
– भाजपच्या छळवणुकीला जनता आता कंटाळली आहे. मोदी आणि शहांच्या विरोधात देशात सर्वत्र प्रचंड चीड आहे. त्यामुळे या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना आता लवकरच पायउतार व्हावे लागेल, असा विश्वासही शिवसेना नेते अनंत गीते यांनी यावेळी व्यक्त केला.
– गोपीनाथ भगत आणि सचिन गायकवाड यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कामोठे परिसरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याने भाजप आणि शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी धास्तावले आहेत.
महापालिकेवर मोर्चा काढणार
पनवेलकरांना ऑक्टोबर महिन्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरलेले आहे. या पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी दसऱ्यानंतर पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा यावेळी शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी दिला.

























































