
हॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पुरस्कार-विजेती लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ब्रेकिंग बॅड’मधील सर्वात तरुण अभिनेता आर. जे. मिट्टे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले आहे. या टीव्ही मालिकेत वॉल्टर व्हाईट ज्युनियर म्हणजेच फ्लिन ही भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते आणि जगभरातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
हॉलिवूड अभिनेते आर. जे. मिट्टे यांच्या निधनाची घोषणा त्यांच्या प्रतिनिधीने सोमवारी एएफपीला केली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले, तरी आर. जे. मिट्टे हे काही काळापासून सेरेब्रल पाल्सी या आजाराशी झुंज देत होते, असे माहितीमधून स्पष्ट झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाची माहिती देताना त्यांचे प्रतिनिधी शॉन रायली यांनी एका निवेदनात म्हटले की, अत्यंत दुःखाने आम्ही आमचे लाडके अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते आणि दिव्यांगांच्या हक्कांचे खंबीर समर्थक, आर. जे. मिट्टे यांच्या दुःखद निधनाची घोषणा करत आहोत.
आर. जे. मिट्टे यांच्या कारकिर्दीचा प्रवास पाहता, 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रेकिंग बॅड’ या गाजलेल्या मालिकेत एका किशोरवयीन अभिनेत्याच्या भूमिकेतून त्यांना जागतिक स्तरावर खरी ओळख मिळाली. अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले की, सेरेब्रल पाल्सीसोबतच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांचा प्रभावी वापर करून मिट्टे यांनी हे पात्र जिवंत केले आणि ते पडद्यावर अत्यंत वास्तववादी बनवले. तसेच, या व्यासपीठाचा वापर त्यांनी अपंगत्वाविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर केला.
याशिवाय, हे लोकप्रिय अभिनेते नंतर ‘शायनर्स चिल्ड्रन्स’ या ना-नफा तत्त्वावरील रुग्णालय नेटवर्कचे सदिच्छादूत बनले होते. ते ‘मिट्टे फाउंडेशन’चे अध्यक्षही होते, ज्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना नेहमीच खंबीर पाठबळ दिले. त्यांची ‘ब्रेकिंग बॅड’ ही मालिका 2008 मध्ये सुरू होऊन 2013 पर्यंत चालली होती. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने ‘ब्रेकिंग बॅड’मधील त्यांचे सर्व सहकलाकार आणि जवळचे मित्र अत्यंत भावूक झाले असून, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

























































