जर्मनीमध्ये इमारतीला भीषण आग; ३ हिंदुस्थानींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर्मनीतील बोचुम शहरात एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तीन हिंदुस्थानी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या संशयावरून एका संशयिताला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीच्या बोचुम शहरातील हॉफस्टेड परिसरात एका निवासी इमारतीला बुधवारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २५ आणि २७ वर्षीय दोन तरुणी आणि २६ वर्षीय एका तरुणाचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना या तिघांचेही मृतदेह इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका अपार्टमेंटमध्ये आढळून आले.

या आगीमुळे सर्वत्र प्रचंड धूर पसरला होता. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने अन्य ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बोचुम येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, जखमी झालेल्या नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

हत्येच्या संशयावरून एकाला अटक

ही आग केवळ दुर्घटना नसून घातपात असल्याचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपासाची चक्रे फिरवत याच इमारतीत राहणाऱ्या एका रोमानियन नागरिकाला हत्येच्या संशयावरून अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.