
वाहनाची नोंदणी परराज्यांत करून मुंबईच्या रस्त्यांवर वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दंडात्मक कारवाईचा दणका दिला. ताडदेव आणि अंधेरी येथील आरटीओने विशेष तपासणी मोहिमेत इतर राज्यांतील नोंदणीकृत अशा 260 हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात आलिशान गाड्यांचे प्रमाण अधिक आहे.
परराज्यांत विशेषतः दीव-दमण येथे नोंदणी झालेल्या आणि मुंबई-महाराष्ट्रात धावणाऱया उच्च किमतीच्या वाहनांविरोधात परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशावरून कारवाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई मध्य आरटीओने वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या टोलनाक्यावरील विशेष तपासणी मोहिमेत 132 वाहनांवर केली. या मोहिमेसाठी तीन वायुवेग पथके तैनात केली होती. याअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पाच मोटार वाहन निरीक्षक आणि पाच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांनी वाहनांची तपासणी केली. महाराष्ट्रातील कर नियम पाळण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
अंधेरीत दोन दिवसांत 80 गाड्यांवर कारवाई
अंधेरी आरटीओने धडक मोहीम राबवून 11 दिवसांत 130 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. मागील दोन दिवसांत 80 गाडय़ांना कारवाईचा दणका देण्यात आला. संबंधित वाहनांना एकरकमी कर भरण्याबाबत प्रतिवेदन जारी करण्यात आले. सर्व वाहनांचे कागदपत्र जप्त केले असून त्यांची कार्यालयीन स्तरावर पुनश्च पडताळणी केली जाईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.
परराज्यांत, विशेषतः दीव- दमणसारख्या भागात तुलनेने कमी कर भरावा लागत असल्यामुळे वाहनधारक तिथे नोंदणी करतात आणि कायमस्वरूपी महाराष्ट्रात गाडय़ा चालवतात. अशा वाहनांवर कारवाईची मोहीम सुरूच ठेवली जाईल.
राजेश नार्वेकर, परिवहन आयुक्त





























































