
‘मोदी सरकारने देशातील स्वायत्त संस्थांवर कब्जा करण्याची योजनाच आखली आहे. 2014 पासूनच त्यावर काम सुरू झाले आहे. मुख्य प्रवाहातील मीडियासह इतर अनेक संस्था त्यांनी पूर्णपणे ताब्यात घेतल्या असून आता सर्वोच्च न्यायालयावरही कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. कपिल सिब्बल यांनी आज केला.
एसआयआर व ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱयांवर सरकारने केलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी यावेळी सरकारच्या हुकूमशाहीवर हल्ला चढवला. ‘सत्तेवर येताच मोदी आणि भाजपने सर्वात आधी मीडिया ताब्यात घेतला. तळागाळातील प्रश्न आणि घडामोडी जनतेपर्यंत पोहोचूच नयेत अशी व्यवस्था केली. मीडियानंतर विद्यापीठे, राज्यपाल व इतर संस्था ताब्यात घेतल्या. सर्वोच्च न्यायालय त्यांना अजूनही नियंत्रणाखाली घेता आलेले नाही. तसा प्रयत्न सुरू नक्कीच आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला.
शांततापूर्ण आंदोलन हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. संविधानसंमत कारण दिल्याशिवाय हा अधिकार हिसकावून घेता येत नाही, मात्र गेल्या काही दिवसांच्या आंदोलनात सरकारने सर्रास घटनेचे उल्लंघन केले. कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. हे प्रतिबंध लादण्याची कारणे सरकारने स्पष्ट करायला हवी होती. या संदर्भातील याचिकांच्या सुनावणीवेळी आम्ही यावर युक्तिवाद करू, असे सिब्बल म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालय या सर्व गोष्टींचा विचार करेल आणि लोकांच्या निदर्शने करण्याच्या अधिकारांचे रक्षण करेल,’ असेही सिब्बल म्हणाले.
‘सध्याच्या परिस्थितीत संविधानाला कुणी वाचवू शकतो तर ते फक्त सुप्रीम कोर्ट आहे. पण माझं वैयक्तिक मत विचारालं तर मी सुप्रीम कोर्टात जाऊन जाऊन थकलोय. तिथं जाऊन काही फायदा होईल असं वाटत नाही. इतरांचं माहीत नाही. पण एक संस्था म्हणून मला सुप्रीम कोर्टाकडून काहीही आशा नाही.’
लोकांनाच सत्तापरिवर्तन हवे आहे!
बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने सत्तांतर झाले, त्या पद्धतीने काँग्रेसला हिंदुस्थानातील सत्ता उलथवून टाकायची आहे, असा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याचा सिब्बल यांनी समाचार घेतला. ‘सत्तापरिवर्तन काँग्रेसला नव्हे, लोकांनाच हवे आहे,’ असे सिब्बल म्हणाले. सध्या सुरू असलेल्या आंदोलनांची तुलना त्यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनाशी केली. ते म्हणाले, ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात घोषणा देऊन भाजप सत्तेत आला होता. पण सत्तेत येताच भ्रष्टाचार सुरू केला, संस्था ताब्यात घेतल्या, मतदार याद्यांमध्ये घोटाळे केले. आता या सरकारची जाण्याची वेळ आली आहे,’ असे सिब्बल म्हणाले.





























































