साहिल वाकोडेला न्याय द्या; आयआयटीबाहेर तीव्र निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही कुटुंबीयांच्या मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नसल्याच्या निषेधार्थ रविवारी पवई येथील आयआयटी मुंबईच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करण्यात आले.  यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

ऑल इंडिया इंडिपेंडंट स्टुडंट्स ऍण्ड सिटिझन्स अलायन्सचे (एआयआयएससीए) प्रमुख डॉ. राहुल सोनपिंपळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.  साहिलच्या कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात  काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख सहभागी झाले. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘साहिलचा मृत्यू होऊन एक महिना उलटून गेला आहे तरीही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्याला न्याय मिळावा, ही त्याच्या पालकांची आणि आमचीही मनापासून इच्छा आहे. आयआयटी मुंबईत या संस्थेत आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना झालेल्या आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करा. साहिल वाकोडेप्रकरणी आयआयटी पवईमधील विद्यार्थी आंदोलन करत असताना पोलिसांनी संस्थेत घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हे विद्यार्थी आहेत, ते काय गुन्हेगार आहेत का? आयआयटी संस्थेच्या परिसरात पोलीस अत्याचार कोणाच्या आदेशाने होत आहेत?

या प्रकरणात न्याय्य कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे.