
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या 41 भाविकांना ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन पोलीस कर्मचाऱयांसह 26 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
भाविक शितला माता मंदिरात जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला रांगेत उभे होते. त्याच वेळी, भाताने भरलेला एक ट्रक छिनोरच्या दिशेने जात असताना तीव्र उतारावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेला ट्रक भरधाव वेगाने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि मंदिराच्या बाहेरील भीतीला व गेटला जाऊन जोरात धडकला. दरम्यान रस्त्याने चालणारे भाविक, पोलीस कर्मचारी व रांगेत उभे असलेल्या भाविक ट्रकखाली चिरडल्याची माहिती ग्वाल्हेरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिली.
वाराणसीत बिथरलेल्या हत्तीचा धुमाकूळ
रामलीलेसाठी आणलेल्या हत्तीने धुमाकूळ घातल्याची घटना पंचवटी मैदान परिसरात घडली. हा हत्ती आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू सोंडेत उचलून फेकू लागला, रस्त्यावरील खांब, झाडे उखडून टाकले. माहुतालाही सोंडेने उचलून आपटले. या हत्तीला पाहीन एकच दहशतीचे वातावरण पसरले होते. वनविभाग व एनडीआरएफचे जवळपास 200 जण या हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.





























































