मला ५०० कोटी रुपये हवे आहेत असे तुम्ही भाजपच्या लोकांना सांगितले का? जरांगे पाटील यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल, उद्या संध्याकाळपर्यंत मागितले उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडच्या नारायण गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याकडे 500 कोटी रुपयांबाबत स्पष्टीकरण मागितले. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांना आपल्याबद्दल खोटी माहिती दिली का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचे शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले का, याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मनोज जरांगे म्हणाले की, दिल्लीत भाजपचे नेते आपल्याबद्दल कुजबुज करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचे असून, भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन ते आपल्याला दिल्याचे सांगितले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘एकनाथ शिंदे, तुम्ही मला 500 कोटी रुपये दिले का? जर तुम्ही मला पैसे दिले नसतील, तर भाजप नेमकं तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला संपवत आहात? याचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

याबाबत एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातून उत्तर द्यावे, अशी मागणीही जरांगे यांनी केली. आज संध्याकाळी उत्तर द्या, अन्यथा उद्या सकाळी उत्तर द्या, असे ते म्हणाले. आता आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार असून, संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मी उद्या सकाळी मराठ्यांना 100 रुपये टाका, असे सांगितले, तर माझ्याकडे उद्या 2500 कोटी रुपये जमा होतील. हा काही लहान विषय नाही, शिंदे,’ असे म्हणत जरांगे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. तसेच, ‘तुमचा आणि माझा सामना तीन महिन्यांनंतर होईल,’ असा इशाराही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला.