हे जनतेचं बंड आहे आणि या बंडाचे सेनापती उद्धव ठाकरे आहेत – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना दसरा मेळाव्यात शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला साठ वर्षे होताहेत असे म्हणत राऊतांनी भाषणास सुरुवात केली. साठ वर्षांचा हा कालखंड ज्यांनी पाहिला आणि अनुभवला जे साठ वर्षे या अग्निसोबत जगले ते धन्य झाले. या शिवतीर्थावर अनेक पिढ्या निर्माण झाल्या. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने धगधगून पेटून उठल्या. शिवसेना एकच. हा समोर जो आहे हा टिकाऊ माल आहे. विकाऊ माल तिकडे आहे. तिकडे अमित शहाचा दांडिया आहे. तिकडे विचार नाही संघर्ष नाही, असे म्हणत राऊत यांनी मिंधेंवर टीकास्त्र डागले.

महाराष्ट्र धर्म इकडे आहे. इथे प्रत्येकाच्या हातात बांबू आहे तो कुठे जाईल कळणार नाही. हे मी गद्दारांसाठी बोलतोय असे म्हणत राऊतांनी मिंधेवर चांगलेच आसूड ओढले. अधिक बोलताना ते म्हणाले. या देशाचे गृहमंत्रीच एक माफिया आहे. म्हणून आम्हाला हे रेजिम चेंज करायचं आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावले. मित्रांनो या शिवसेनेशी पंगा घेण्याचे प्रयत्न गेल्या साठ वर्षात झाले. भलेभले आले आणि गेले. पण या व्यासपीठावरील नेत्यांची गर्दी कमी झाली नाही. आणि समोर लाखोंच्यागर्दीला ओहोटी लागली नाही. ही मुंबई महाराष्ट्राची आहे, ठाकरेंची आहे.

नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी मुहूर्त काढला होता. तो मुहूर्त चुकला. राम मंदिर ज्या पद्धतीने लुटलं गेलंय दानपेटीवर दरोडे पडले. मोदी तुमचा मुहूर्त चुकला. राम मंदिरात काय काय चोरी झाली. ज्या अयोध्येत आम्ही सर्व आंदोलनात सहभागी झालो. रक्त सांडलं. ते राम मंदिर उभ राहिलं तिथे भारतीय जनता पक्षाच्या चोरांनी लूट केली. सीतामाईंची कर्णफुलं चोरली, मंगळसूत्र चोरली. येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोदी देखील सत्तेतून जाणार, ज्ञानू तर गेलाच. मोदी देखील सत्तेतून जाणार.

दोन लाखांचं सैन्य अमित शहांच्या सुरक्षेसाठी आहेत. तर आपले प्रधानमंत्री घाबरलेले आहेत. अल्बेनियामध्ये लोकांनी सुप्रीम कोर्ट जाळलं. इटलीमध्ये लोक रस्त्यावर आहेत. फ्रान्स आणि हिंदुस्थानातही लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आता मोदी शहांना लोक घाबरत नाहीत. या देशामध्ये विद्यार्थी नाराज आणि रस्त्यावर आहेत. शिक्षक रस्त्यावर आहेत. शेतकरी रस्त्यावर आहेत. मोदींविरोधात इतके प्रचंड जनमत असताना यांना मत देतेयं कोण? तर ज्ञानू असे म्हणत राऊत यांनी शरसंधान साधले. हे रेजिम आपल्याला चेंज करावे लागेल. त्यासाठी आजचा हा शिवसेनेचा विराट मेळावा होतोय. आता आम्ही कुणाकडे याचना करणार नाही. अब याचना नही रण होगा.. जीवन जय की मरण होगा. संघर्ष बहुत भीषण होगा. छातीवर गोळ्या झेलू पण या देशात तिरंगा फडकवणाच्या विरोधात असणाऱ्या सरकारला कायमचं तुरूगांत पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तख्त बदल दो, ताज बदल दो, व्होट चोरो का राज बदल दो, बेईमानो का राज बदल दो. हे सांगण्यासाठी आजची विराट सभा आणि दसरा मेळावा आहे. हे जनतेचे बंड आहे आणि या बंडाचे सेनापती उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भाषणाचा समारोप करत सत्ताधाऱ्यांना ठणकावले.