
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शूटर फुलसिंग, रेहान आणि बाईक चालक ऋतिक यांना बुधवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे अद्याप सापडलेली नाहीत आणि आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन नष्ट केले आहेत, असे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.
हरियाणा आणि दिल्लीतून आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना मुंबईत आणले जात आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. आरोपींमध्ये दोन महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. याशिवाय आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांनी अमृतसर येथून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे घेतली मग दोघा महिलांनी ती रेल्वेने मुंबईत आणून शुटर्सना दिली. एका आरोपीने लॉजिस्टिक सपोर्ट दिला. अन्य एक जण आरोपींसोबत रेकी वगैरे करायला होता.
सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे. कटाचा अद्याप पूर्णपणे उलगडा व्हायचा आहे. गुन्ह्याच्या आर्थिक बाबी तसेच मोबाईल फोनच्या विल्हेवाटीची चौकशी करणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी करताना केला.

























































