
संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी देशातल्या तरुणांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांची आज भेट घेतली. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती असे सांगतानाच ‘ये दोस्ती आगे चलते रहेगी’ अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
तेजस्वी यादव आणि आपण नेहमी संपका&त होतोच, पण आता हिंदुस्थानातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे, असा ठाम विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.
ही भेट जनहितासाठी…
‘ही राजकीय भेट नसून प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. तेजस्वी यादव हे जनहितासाठी प्रभावीपणे काम करत आहेत आणि आता एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यासाठीच ही भेट घेतली,’ असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्यावरण, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्या आदी मुद्दय़ांवरही तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा केली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होते.
लोक जोडण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न
आदित्य ठाकरेंसारखा एक युवा नेता चांगलं काम करतोय. लोक जोडण्याच्या आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. बेस्ट ऑफ लक आदित्यजी, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱयासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले – आदित्य ठाकरे
गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याचं बोलले जात आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘ईडी’ सरकारवर निशाणा साधला. आज मंत्रिमंडळ बैठक रद्द केली आहे. कारण आपले मंत्री गुजरातच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. ‘ईडी सरकारने आधी सरकार स्थापन करण्यासाठी आमदार गुजरातला पाठवले. मग तरुणांच्या हाताला रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला पाठवले आणि आता तर निवडणूक प्रचारासाठी मंत्रीही गुजरातला पाठवले आहेत असा टोला लगावतानाच यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांपेक्षा गुजरातची निवडणूक महत्त्वाची आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही घेतली भेट
आदित्य ठाकरे यांनी पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. ‘नितीशकुमार हे पर्यावरण रक्षणासाठी चांगले काम करत असून ते स्वतः इलेक्ट्रिक गाडी वापरतात. त्यांच्यासोबत पर्यावरण विषयावर चर्चा झाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नितीशकुमार यांचे जुने संबंध आहेत. त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,’ अशा भावना आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
























































