
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पहिल्यापासून शिवसेनेची भूमिका होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. त्याबद्दल विधानसभेचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आदित्य ठाकरे विधान भवनातील प्रेक्षक गॅलरीत हजर होते. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरही होते.
मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. हे विधेयक मंजूर झाल्यावर आदित्य ठाकरे विधान भवनातून बाहेर पडले. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे यांना गराडा घातला व प्रतिक्रिया विचारली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सुरुवातीपासूनची शिवसेनेची भूमिका होती. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला द्या अशी शिवसेनेची भूमिका होती. या निर्णयाबद्दल विधानसभेचे अभिनंदन करतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

























































