शिवसेनेच्या सत्ताकाळातील ‘भूमिगत टाक्या’च भाजपला आता ‘कामा’च्या वाटताहेत! आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दरवर्षी तुंबणाऱया ठिकाणी शिवसेनेच्या सत्ताकाळात आमच्या संकल्पनेतून भूमिगत टाक्यांचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. वर्षानुवर्षे तुंबणारी ठिकाणे पूरमुक्त झाली. तेव्हा भाजप शिवसेनेच्या या उपक्रमाला नावे ठेवत होती. मात्र आता अंधेरी सब वेसह पाणी तुंबणाऱ्या इतर ठिकाणी भूमिगत टाक्यांचा प्रयोग करण्याची घोषणा सत्ताधाऱयांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सत्ताकाळातील ‘भूमिगत टाक्या’च भाजपला आता ‘कामा’च्या वाटताहेत, असा टोला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱयांना लगावला आहे.

अंधेरी सब वे येथे थोडय़ाशा पावसामुळे पाणी साचले आणि वाहतूककोंडी झाली. त्यानंतर आता उशिराने जाग आलेले सत्ताधारी आणि प्रशासन आमची रेन वॉटर होल्डिंग टँकची योजना पुन्हा कार्यान्वित करीत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. आम्ही हिंदमाता, गांधी मार्पेट आणि मिलन सब वे अशा ठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था केल्याने तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला असे ते म्हणाले.

अंधेरीत सर्व स्तरांवरील स्थानिक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे असूनही हलक्या पावसातही सब वेमध्ये पाणी साचते ही आश्चर्याची बाब आहे. विशेष म्हणजे गेली चार वर्षे या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. भाजपने चांगल्या योजना बंद पाडल्या

पेंद्रापासून महापालिकेपर्यंत सत्ता असताना आणि गेली चार वर्षे महापालिका प्रशासन पूर्ण नियंत्रणात असताना भाजपने रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे चांगले प्रकल्प बंद पाडल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. ही गोष्ट धक्कादायक असल्याचा संतापजनकही आहे.

मुंबईला अधिक ‘मान्सून रेजिलियंट’ (पाणीपुरवठय़ासाठी डिसॅलिनेशन प्रकल्प उभारून) आणि ‘मान्सून अॅडॅप्टिव्ह’ (स्पंज सिटी बनवून) बनवणे ही काळाची गरज आहे. परंतु 2022 च्या मध्यापासून भाजप सरकार या दोन्ही उपक्रमांना विसरून गेले.