महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून यांची दिल्लीची हुजरेगिरी थांबतच नाहीये, आदित्य ठाकरेंचा कडाडून हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःच्या राज्यात शेतकरी आत्महत्या, युवकांसाठीचे रोजगार, महिलांची सुरक्षा, पायाभूत सोयींच्या प्रकल्पांमध्ये होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार, राज्यात मोठे उद्योगधंदे आणण्यात येत असलेलं अपयश, अनागोंदी कारभार असे अनंत प्रश्न असतानाही घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र विधीमंडळाचं अधिवेशन सोडून ‘महाशक्ती’ च्या आदेशाप्रमाणे राजस्थान दौऱ्यावर निघाले आहेत, असा कडाडून हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधीला गेले आहेत. यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, दिघा रेल्वे स्टेशन, उरण लाईन, डोंबिवली माणकोली कनेक्टर ह्या प्रकल्पांचं उद्घाटन VIP आगमनासाठी रखडलेलं ठेवून स्वतः मात्र दुसऱ्या राज्याच्या शपथविधीला जायची घाई झालीये, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

धारावी बचाव मोर्चावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. धारावीचा विकास होत असताना सरकारच्या मित्राचा, एका व्यक्तीचा विकास होऊ नये. नफा नक्कीच कमवावा, पण त्यावर सरकारचे नियंत्रण असावे. महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा सरकारचा कसा फायदा होईल हे बघून बीडीडी चाळींचा विकास सुरू केला. मात्र इथे सरकार एवढ्या मेगा सवलती देत असेल तर सरकारच पुनर्विकास का करत नाही? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

धारावीच्या माध्यमातून भाजपचे उद्योगपती जावई अख्खी मुंबई गिळायला निघालेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळीतून लढावे हे मी दीड वर्षापासून सांगतोय. ते तयार नसतील तर मी त्यांच्यासमोर ठाम्यातून लढायलाही तयार आहे, असा पुनरुल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच भाजपने सर्व आमदारांना लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या चर्चा होत असल्या तरी निवडणुका होत नाहीये. हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरेही ओढले. पुणे आणि चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक घ्यायला हवी. तिथून आवाज उठवायला दिल्लीत प्रतिनिधी नाही. याला लोकशाही म्हणत नाहीत. महानगरपालिकेच्याही निवडणुका नाहीत, सिनेटच्या निवडणुकाही घेत नाहीत, कारण यांच्यात हिंमत नाही. आपल्या राज्यात लोकशाही मारलेली, संपलेली असून ती पुनर्जिवीत करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जखम मांडीला अन्…

दरम्यान, बोरिवली-विरार रेल्वेसाठी कांदळवन हलवण्याचा प्रस्ताव असून ते गडचिरोलीला लावणार आहेत. हा प्रकार म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.