महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही -आमिर खान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर या चित्रपटाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चित्रपटसृष्टीतही ‘ठाकरे’ सिनेमाचीच चर्चा सुरू आहे. ‘महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. त्यामुळे ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होताना कोणत्याही सिनेनिर्मात्याला यावेळी आपला चित्रपट प्रदर्शित करावासा वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आमिर खान याने दिली आहे. लहान मुलांमधील स्थूलपणाविषयी वेबसाइट लाँचिंगच्या पत्रकार परिषदेत आमिर खान बोलत होता.

ठाकरे सिनेमा प्रदर्शित होत असलेल्या दिवशी अन्य चित्रपटांचे प्रदर्शन निर्मात्यांनी पुढे ढकलण्याबाबत विचारले असता तो म्हणाला, प्रत्येक निर्मात्याला आपला चित्रपट चांगल्या दिवशी प्रदर्शित व्हावा असेच वाटत असते. त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणताही मोठा चित्रपट येणार असेल, त्यावेळी आपला चित्रपट क्लॅश व्हावा असे कोणत्याही निर्मात्याला वाटणार नाही. महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. त्यामुळे या दिवशी कोणाही निर्मात्याला आपला चित्रपट क्लॅश करावासा वाटणार नाही. बाळासाहेबांवरील चित्रपट महाराष्ट्रात प्रत्येकालाच पहावासा वाटणार, त्यामुळे कोणताही निर्माता आपला चित्रपट या दिवशी प्रदर्शित करू इच्छिणार नाही, असेही आमिरने सांगितले.