
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील आंजर्ले ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी एक ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गाव हद्दीत एकल वापराच्या (Single Use Plastic) प्लास्टिकवर संपूर्ण बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आंजर्ले हे गाव प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या तालुक्यातील अग्रगण्य गावांमध्ये समाविष्ट झाले आहे.
ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयानुसार, गावाच्या हद्दीत कोणताही दुकानदार, व्यावसायिक किंवा नागरिक एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर अथवा वितरण करताना आढळल्यास संबंधितावर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकाराची माहिती ग्रामपंचायतीला देणाऱ्या व्यक्तीस २५० रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून उर्वरित २५० रुपये ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्लास्टिकविरोधी मोहिमेत नागरिकांचा थेट सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आंजर्ले हे समुद्रकिनारा, कड्यावरचा गणपती मंदिर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध गाव आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणास गंभीर धोका निर्माण होत असल्याची बाब ग्रामसभेत अधोरेखित करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने कठोर भूमिका घेत हा निर्णय जाहीर केला. ग्रामपंचायतीने नागरिक आणि व्यापाऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला आहे. अनेकांना “एकल वापराचे प्लास्टिक” म्हणजे नेमके काय, याची पुरेशी माहिती नसल्याने ग्रामपंचायतीने अशा वस्तूंची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी पुढे येत आहे. प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ, प्लास्टिक चमचे, काटे, कप, ग्लास, खाद्यपदार्थांचे कंटेनर, प्लास्टिक रॅपर्स यांसारख्या वस्तूंचा यात समावेश होतो.
दरम्यान, व्यापारी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष बैठक किंवा जनजागृती मोहीम राबवावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्वांना त्याची सविस्तर माहिती मिळणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे किंवा पर्यावरणास हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आंजर्ले ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, “एकल वापराच्या वस्तूंचा त्याग करा आणि शाश्वत पर्यावरण विकासाला हातभार लावा” हा संदेश आता गावागावात पोहोचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.






























































