
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली सतरा वर्षे सुरु आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून हा महामार्ग पूर्ण करण्याच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. नवीन तारखांचे एकही आश्वासन अद्याप पाळले गेले नाही. संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या कामाची सुरुवात २०२१ मध्ये करण्यात आली होती. अत्यंत संथ गतीने सुरु केलेल्या या पूलाचे काम अखेर ९० टक्के पूर्णत्वास गेले असून सोमवारपासून या पूलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आल्यामुळे सोनवी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता संपुष्टात आला आहे.
सोनवी नदीवरील नवीन पुलाच्या कामाची सुरुवात २०२१ मध्ये करण्यात आली होती. पुलाचे पिलर थोडे वरती आल्यानंतर हे काम जवळपास नऊ महिने रखडले होते. त्यानंतर सुरू झालेले काम देखील अत्यंत संथ गतीने केले गेल्याने या पुलाच्या पूर्णत्वास प्रत्यक्षात सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. या पुलावरून आजपासून एकेरी वाहतूक सुरू झाली असली तरीही पुलावरील अनेक कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहेत. सध्या एका मार्गेकेवरून वाहनांची जा – ये सुरू झाली असली तरी, पुलावर आवश्यक त्या सर्व संरक्षक उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
सोनवी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्याने संगमेश्वर पोलीस आणि वाहतूक पोलीस शाखेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. गेले चार महिने पर्यटनाच्या काळात सोनवी चौक येथे तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पोलिसांवर कमालीचा ताण आला होता. याबरोबरच वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक देखील कमालीचे त्रस्त होत होते.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेली सतरा वर्षे रखडला आहे. अद्याप अनेक ठिकाणी अनेक कामे पूर्ण होणे बाकी आहेत. परिणामी पुढील दोन वर्षे तरी हा मार्ग पूर्ण होण्यास लागणार असल्याचे चित्र दिसत आहे . अद्याप अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या पूलांची, सेवा रस्त्यांची, सुरक्षाविषयक भिंतींची, मार्ग फलकांची, गटारांची, प्रवासी मार्ग निवाऱ्यांची, अनेक सुरक्षा उपायांची, महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपणाची कामे बाकी आहे.
संगमेश्वर येथील सोनवी पुलाचा परिसर म्हणजे वारंवार होणारी वाहतूक कोंडी. एकदा का येथे वाहतूक कोंडी झाली कि, किमान दीड तास तरी वाहन चालकांचा आणि प्रवाशांचा खोळंबा होतो. संगमेश्वर येथे वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ लक्षात घेता प्रवाशांकडून ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गाच्या नावाने वेळोवेळी शिमगा केला जात होता . मात्र या दोघांवरही याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. अखेर आज सोमवारपासून सोनवी पुलाची एक मार्गिका सुरू झाल्याने सोनवी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आज पासून संपुष्टात आला आहे.
आंबेडखुर्द, शास्त्री पूल आणि पैसा फंड इंग्लिश स्कूल समोर अद्याप सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. परिणामी येथे वारंवार अपघात घडण्याची स्थिती निर्माण होते. असे असताना या महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल वाहनचालक प्रवासी, पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पैसा फंड इंग्लिश स्कूल येथील सर्विस रोड अद्याप दगड मातीने भरलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी १५ जून पासून या मार्गावरून शाळेत जायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येथील सर्विस रोड तातडीने दुरुस्त करून त्यावर डांबरीकरण करून घ्यावे अशी मागणी व्यापारी पैसा फंड संस्थेने आणि पालक वर्गाने केली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आरवली ते बावनदी या हद्दीतील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची पातळी समान नसल्याने वाहन वेगाने जात असताना मध्येच वाहन आपटून आतील प्रवाशांना मार बसत आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीच्या लोखंडी सळ्या तशाच अर्धवट सोडून ठेवल्याने धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी अद्याप फलक लावले नसल्याने वाहन चालकात संभ्रम निर्माण होत आहे.





























































