जेवायला जातो सांगून घरून निघाला, पुण्याच्या तरुणाची अटलसेतूवरून समुद्रात उडी; शोधमोहिम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील तरुणाने अटलसेतूवरून समुद्रात उडी घेतल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. प्रतिक सुभाष रासकर (28) असे उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. समुद्रात बेपत्ता झालेल्या प्रतिकचा शोध सुरू आहे. पोलीस, मच्छीमार, सागरी दलाच्या मदतीने प्रतिकचा समुद्रात शोध सुरू आहे.

शिरुर-पुणे येथे रहिवासी असलेला प्रतिक शेअर बाजारात संबंधित कामे करीत होता. रविवारी रात्री तो घरच्यांना बाहेर जेवायला जातो असे असे सांगून आपल्या चारचाकीतून घराबाहेर पडला होता. मात्र तो थेट अटलसेतूवर पोहचला. प्रतिकने रविवारी मध्यरात्री 1.29 वाजता अटलसेतूवर आपली कार थांबवली आणि सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट समुद्रात उडी घेतली.

जेवायला बाहेर पडलेला प्रतिक बराच वेळ झाला तरी घरी आला नसल्याने घरचे चिंतेत होते. मात्र सोमवारी सकाळीच समुद्रात उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अटलसेतूकडे धाव घेतली. याप्रकरणी प्रतिकचे मेव्हणे धीरज जाधव यांनी उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रतिक हा एकुलता एक मुलगा असल्याचे मेव्हणे धीरज जाधव यांनी सांगितले.

दरम्यान अटलसेतु वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून आतापर्यंत 15 हून अधिक इसमांनी पुलावरून उडी घेतली आहे, असे उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणे यांनी सांगितले. अधिक तपास एपीआय अनिल राजुरे करीत आहेत.