Ratnagiri News – अखेर देवरुखकरांच्या लढ्याला यश; आगारात दाखल झाल्या ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक सही एसटीसाठी’ या मोहिमेपासून सुरू झालेली देवरुखकरांची लोकचळवळ अखेर विजयी झाली आहे! संगमेश्वर तालुक्यातील जनतेने आणि ‘आंदोलन समिती, आपलं देवरुख लोक चळवळ’ यांनी प्रवाशांच्या हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले असून, देवरुख आगाराच्या ताफ्यात ५ अत्याधुनिक नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत.

​सोमवारी देवरुख बस स्थानक येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात या बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. स्थानिक ग्रामस्थ, एसटी प्रेमी आणि आंदोलनकर्त्यांच्या अभूतपूर्व एकजुटीमुळेच हे यश शक्य झाले. या सोहळ्याप्रसंगी देवरुखच्या आगारप्रमुख रेश्मा मदाळे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, निखिल कोळवणकर, अभिजित शेट्ये, प्रफुल्ल भुवड, संतोष लाड, बापु गांधी, रामु पंदेरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, आगार व्यवस्थापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ५ नवीन बसेसमुळे संगमेश्वर तालुक्यातील प्रवासी वाहतूक अधिक सक्षम आणि आरामदायी होणार आहे. अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्यामुळे तालुक्यातील जनतेने आणि प्रवाशांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे.