
सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची 5.30 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बाप-लेकीला बंगळुरू पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मन्सूर अहमद आणि शमशाद बेगम अशी अटक केलेल्या बाप-लेकीचं नाव आहे. एका पीडित व्यक्तीने तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
रेडिफ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी एका पीडित व्यक्तीने फसवणुकीबाबत तक्रार दिल्यानंतर सेंट्रल क्राईम ब्रँचने (CCB) या प्रकरणाचा तपास सुरू केला. उत्तर कर्नाटकातील 40 हून अधिक बेरोजगारांना लक्ष्य करण्यात आले होते. वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी आपले संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या रेल्वे, आयकर, जलसंपदा, आरोग्य आणि समाजकल्याण यांसारख्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळवून देऊ, असे खोटे सांगून या बाप-लेकीने सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांची फसवणूक केली.
नोकरीचे आमिष दाखवून आरोपींनी पीडितांकडून 5.30 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळली. त्यानंतर त्यांना बनावट नियुक्ती पत्रे दिली आणि बेंगळुरू, मुंबई व कोलकाता येथे बनावट प्रशिक्षण केंद्रेही सुरू केली होती, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीडितांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी काही उमेदवारांना चार महिन्यांचे वेतनही दिले होते, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. तपासादरम्यान 4 जून रोजी या बाप-लेकीला अटक करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.



























































