Yavatmal News – झिरो टॉलरन्सचा धडाका; एलसीबीच्या छाप्यात अडीच किलो गांजा जप्त, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवैध अमली पदार्थांविरोधात यवतमाळ पोलिसांनी सुरू केलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे धडक कारवाई केली. त्यात एका व्यक्तीच्या घरातून अडीच किलोहून अधिक गांजा जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय पवन राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठाळा गावात छापा टाकला. दिलीप शंकर मसे (वय ३८, रा. विठाळा) याने राहत्या घरी अवैधरित्या गांजाचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून तब्बल २ किलो ४७५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई एपीआय पवन राठोड, पीएसआय कायंदे, हेड कॉन्स्टेबल सोहेल मिर्झा, बबलू चव्हाण, मिथुन जाधव, किशोर झेंडेकर तसेच पोलीस शिपाई अमित झेंडेकर व चालक पोलीस शिपाई कुमरे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

जिल्ह्यात अवैध गावठी दारू, गांजा आणि अन्य अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविले जात असून सातत्याने होत असलेल्या धडक कारवायांमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे.