वीजपुरवठा खंडित झाल्याने घराबाहेर झोपले, अनियंत्रित ट्रॅक्टरने सात जणांना चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीजपुरवठा खंडीत रात्री घराबाहेर झोपलेल्या सात जणांना ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडली. सातही जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिहारमधील सारण जिल्ह्यातील मशराख नगर येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तख्त दलित टोला येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे उकाड्याने हैराण झालेले स्थानिक नागरिक रात्री घराबाहेर झोपले होते. यादरम्यान पनापूरच्या रसौली गावातील ट्रॅक्टरचे वळणावर नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रॅक्टरने घराबाहेर झोपलेल्या नागरिकांना चिरडले. यात सात जण गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर चालक पळून गेला. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ मशराख येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छपरा येथील सदर रुग्णालयात हलवण्यात आले.